नवी दिल्लीः सत्ताधारी भाजपाची गेल्या दोन वर्षांत पाच रत्ने हरपली आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांना भाजपानं गमावलं आहे. भाजपानं गमावलेल्या नेत्यांमध्ये काही राजकारणात सक्रिय होते, तर काहींनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. या पंचरत्नांच्या जाण्याची हानी कधीही भरून न निघणारी आहे. सुषमा स्वराज अन् मनोहर पर्रिकरांसह अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. भाजपाची पंचरत्ने अनंतात विलीन झाली आहे. अटलबिहारी वाजपेयी16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. अटल बिहारी वाजपेयींना किडनीचा त्रास आणि मूत्रमार्गात संक्रमण झाल्यानं 11 जून 2018 रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून अटलबिहारी यांनी पदवी संपादित केली, त्यांना हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयांत प्रावीण्य मिळाले होते. अटलबिहारी वाजपेयींनी तीनदा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. अनंत कुमार केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचं नोव्हेंबर 2018मध्ये निधन झालं होतं. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील श्री शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या 59 व्या वर्षी सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनंतकुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमध्ये मंत्री होते.अनंत कुमार यांना कर्करोगाचा आजार होता. त्यासाठी लंडनला जाऊनही त्यांनी उपचार घेतले होते. नुकतेच, गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर, बंगळुरू येथील श्री शंकर कँसर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. मनोहर पर्रीकरगेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019ला निधन झाले. मनोहर पर्रीकर यांची राजकीय कारकीर्द ही पंचवीस ते सव्वीस वर्षांची. १९९४ साली त्यांनी पहिले यश पाहिले. त्या साली ते पणजीचे आमदार झाले. भाजप व मगोपची त्या वेळी युती होती व पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवावी असे ठरले. आपल्या आयुष्यातील पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पर्रीकर जिंकले व विधानसभेत पोहचले. देशाच्या संरक्षणमंत्रिपदापर्यंत पोहचून आलेल्या या नेत्याची राजकीय कारकीर्द ही केवळ यशानेच भरलेली नाही. ती खूप कष्टांनी, संघर्षाने व बऱ्याच चढउतारांनी भरलेली आहे. अनेकांना ठाऊक नसेल; पण पर्रीकर यांनी प्रथम लोकसभा निवडणूक लढवली होती.
गेल्या दोन वर्षांत भाजपाने गमावली 'पंचरत्न'; कधीच भरून न येणारी हानी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 7:18 PM