नवी दिल्ली : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीचे अभ्यासकअरुण खोपकर यांना ‘चलत चित्रव्यूह’ या स्मृतिग्रंथासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला. कोकणी भाषेत उदय भेंब्रे यांच्या ‘कर्ण पर्व’ या नाटकाची निवड झाली आहे. बंगाली भाषेतील साहित्य कृतीसाठीचा पुरस्कार नंतर जाहीर केला जाणार आहे. अरुण साधू, प्रा. दिगंबर पाध्ये आणि ना.धों. महानोर यांच्या निवड मंडळाने खोपकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली. ताम्रपट, शाल व १ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत साहित्य अकादमीतर्फे ‘साहित्य उत्सवा’त आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमात तो प्रदान केला जाईल.पुण्याच्या ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’चे विद्यार्थी असलेले खोपकर दिग्दर्शक, अभिनेता, निर्माते, अध्यापक आणि अभ्यासक अशा विविधांगी भूमिकांतून गेली चार दशके चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. विविध कलाप्रकारांचा वेध घेणाऱ्या त्यांच्या चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपट - दिग्दर्शकासाठीच्या तीन ‘गोल्डन लोट्स’ पुरस्कारांसह १५हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावर खोपकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाला चित्रपटविषयक सर्वोत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. ‘स्मृतिग्रंथ’ या वर्गात साहित्य अकादमीने पुरस्कारासाठी निवड केलेला ‘चलत चित्रव्यूह’ हा अरुण खोपकर यांनी लिहिलेल्या एकूण १९ मराठी ललितनिबंधांचा ‘लोकवाङ्मयगृह’ने प्रकशित केलेला संग्रह आहे. यापैकी काही निबंधांत खोपकर यांनी भूपेन खक्कर, जहांगीर सबावाला, चार्लस् कोरिया, मणी कौल, ऋत्विक घटक आणि भास्कर चंदावरकर यांच्यासह इतर काही महान कलावंतांची व्यक्तिचित्रे घनिष्ट सहवासातून उलगडली आहेत. काही ललितनिबंध उस्ताद आमीर खान, पं. आरोलकर व कलामंडलम कृष्णा नायर यांच्यासह इतर कलावंतांच्या जीवनगाथेतील रमणीय आठवणींची गुंफण करणारे आहेत. आणखी काही निबंधांत खोपकर यांनी व्हेनिस आणि न्यूयॉर्क या सारख्या शहरांवर संवेदनशील मनाने प्रकट चिंतन केले आहे. ‘कर्णपर्व’ नाटक कुंतीचा ज्येष्ठ पुत्र कर्ण याच्यावर आधारित आहे. लेखक म्हणून पहिलाच सन्मान चलत चित्रव्यूह पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या, ‘लेखक म्हणून हा मला मिळालेला पहिलाच सन्मान आहे, त्यामुळे वेगळेच समाधान वाटत आहे. ‘चलत्-चित्रव्यूह’ या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या माध्यमातून समीक्षावजा शब्दवेध अशा एका आगळ््या-वेगळ््या साहित्य प्रकाराला मान्यता मिळाल्याची समाधानाची भावना मनात आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘चलत्-चित्रव्यूह’ या पुस्तकातून एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून मांडलेली भूमिका मांडली आहे. त्यात अवघड शब्द आणि परिभाषा न वापरता, सहज, सोप्या भाषेत मांडले आहे. या पुस्तकात ‘चलत्-चित्रव्यूह’मध्ये ऋत्विक घटक (रॉयल टायगर आॅफ बेंगॉल), नारायण सुर्वे, दादू इंदुरीकर, भास्कर चंदावरकर, मनी कौल (जे न देखे रवी...) यांची वेधक शब्दचित्रे आहेत. श्री.ना.पेंडसे यांनी लिहिलेली कादंबरी ‘हत्या, पु.ल. देशपांडे यांनी आठ अंकी ‘नभोनाट्य’ ही आकाशवाणीवर दिग्दर्शित केली होती. त्यावेळी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा प्रसिद्धीचा विलक्षण अनुभव घेतला होता, तसेच १९६९ मध्ये मनी कौल दिग्दर्शित ‘आषाढ का एक दिन’ या चित्रपटातही कालिदासाची प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, लेखणीतून उतरलेल्या शब्दांचा सन्मान ही भावनाच वेगळी असते, याची आज जाणीव होत आहे, असेही त्यांनी यावेळेस सांगितले. (विशेष प्रतिनिधी)२३ साहित्यिकांची निवडसाहित्य अकादमीने यंदाच्या पुरस्कारांसाठी इंग्रजीसह २३ भारतीय भाषांमधील साहित्यकृतींची निवड केली आहे. त्यात लघुकथा व कवितांसाठी प्रत्येकी सहा, कादंबरीसाठी चार, ललितनिबंध, समीक्षा आणि नाट्यलेखनासाठी प्रत्येकी दोन आणि स्मृतिग्रंथासाठी एका पुरस्काराचा समावेश आहे. बहुलकर यांना भाषा सन्मानभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना अभिजात व मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल ‘भाषा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख, ताम्रपट व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले, मात्र लेखणीतून उतरलेल्या शब्दांचा सन्मान ही भावनाच वेगळी असते, याची आज जाणीव होत आहे. - अरुण खोपकरमहाकाव्ये ही आमच्या साहित्याचा खजिना आहेत, मात्र त्यांना अंधश्रद्धांतून तोलण्यापेक्षा तर्कशुद्ध-रीतीने ती साहित्य प्रकारात आणली तर साहित्यात मोलाची भर पडू शकेल. नव्या साहित्यिकांनी या पुस्तकापासून ही प्रेरणा घेतल्यास मला आनंदच वाटेल.- उदय भेंब्रे
अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार
By admin | Published: December 18, 2015 3:25 AM