इटानगर : अरुणाचलच्या नमसाई आणि पूर्व सियांग जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या भागात नोआ देहिंग, टेंगापानी आणि जेंगथू नद्यांंना आलेल्या पुरामुळे अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. पुरामुळे अनेक भागांत रस्ते वाहून गेले आहेत, तर पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. विजेचे खांब पडल्याने बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. राष्ट्रीय मार्ग ५२ वर पुरामुळे दोन पूल खचल्याने वाहतूक ठप्प आहे. नमसाई जिल्ह्यात पुराच्या पाण्याने ३,५०० हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. माशांचे ११५ तलाव बुडाले आहेत, तर २५० जनावरे, २०० बकऱ्या, दोन हजार कोंबड्या पुरात वाहून गेल्या आहेत किंवा मृत्युमुखी पडल्या आहेत. या पावसाने ३,५०० घरांचे नुकसान झाले आहे. निवासी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री चाउना मीन आणि आमदार चाऊ जिंगनू हे जिल्ह्यात पाहणी करीत आहेत. सीआरपीएफच्या मदतीने आतापर्यंत २६० लोकांना वाचविण्यात आले आहे. २८ शिबिरे उघडण्यात आली आहेत. त्यामार्फत लोकांना मदत करण्यात येत आहे. काझीरंगात घुसले पाणी आसाममध्ये पुराची परिस्थिती गंभीर झाली आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या अनेक जिल्ह्यांतून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत. साडेबारा लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला असून, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पुराचे पाणी घुसले आहे. येथे लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सैन्याची मदत घेतली जात आहे. चिरांग जिल्ह्यातून २०० जणांना तर बोंगाईगाव येथून १५० जणांना वाचविण्यात यश आले आहे. मोरिगाव, जोरहाट आणि दिब्रूगढ जिल्ह्यात पुराच्या पाण्याने रस्ते वाहून गेले आहेत. दूरसंचार सेवा विस्कळीत झाली आहे. कोकराझार, जोरहाट, बोंगईगाव, दिब्रूगढ जिल्ह्यांत नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने अनेक गावांत पाणी शिरले आहे. आसाममधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकार एक पथक पाठविणार असल्याची माहिती राज्याचे जलसंसाधनमंत्री केशव महंत यांनी विधानसभेत दिली.
अरुणाचल, आसामला तडाखा
By admin | Published: July 27, 2016 2:17 AM