शीलेश शर्मा, नवी दिल्ली/इटानगर काँग्रेस पक्षाला शुक्रवारी अरुणाचल प्रदेशमधील सरकार गमवावे लागले. नुकतेच मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये (पीपीए) विलीन झाल्याची घोषणाही केली. यामुळे अप्रत्यक्ष का असेना भारतीय जनता पार्टीची तेथे सत्ता असेल. काँग्रेस या राजकीय भूकंपाला तोंड देत आहे.काँग्रेसचे प्रभारी महासचिव सी. पी. जोशी यांना आपल्या पक्षात बंडखोरी होत असल्याची कुणकुणही लागली नाही. जेव्हा बंडखोरीची वार्ता पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे पूर्वोत्तर राज्यांत जोशी जेथे कुठे प्रभारी आहेत तेथे अंतर्गत असंतोषाने टोक गाठले आहे.
अरुणाचल प्रदेशात झालेल्या या बंडखोरीनंतर काँग्रेसने कशीबशी बाजू सावरताना मोदी सरकार आणि भाजपवर हल्ला केला. राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणीही केली. पक्षाचे नेते रणदीप सूरजेवाला आणि जोशी यांनी असा युक्तिवाद केला की सगळेच आमदार हे काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते, लोकांनी काँग्रेसला मते दिली होती म्हणून आता नव्याने निवडणूक घ्यायला हवीच. लोकांनी काँग्रेसला कौल दिला होता पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशला नाही. काँग्रेसने नबाम तुकी यांना दूर करून पेमा खांडू यांना मुख्यमंत्री बनविले होते. आज तेच तुकी काँग्रेससोबत असून इतर सगळे आमदार पेमा खांडू यांच्यासोबत पीपीएच्या तंबूत दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. पहिले बंड २०१५मध्ये झाले होते. तेव्हा कालिको पुल २४ आमदारांसोबत स्थानिक पक्ष पीपीएमध्ये दाखल झाले होते. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथे काँग्रेसला सरकार तर पुन्हा मिळाले; परंतु बहुमत सिद्ध करण्यास मुख्यमंत्री नबाम तुकी यांना पदावरून दूर करावे लागले. बंडखोरांच्या दडपणामुळे दोरजी यांचे चिरंजीव पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपद द्यावे लागले. काँग्रेसचा भाजपावर आरोप... या बंडखोरीला काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनाच जबाबदार धरले आहे. मोदी देशाच्या संघरचनेला खिळखिळे करीत आहेत. योजना आयोगाला बंद पाडून निति आयोगाच्या नावावर राज्यांना केंद्राकडून दिला जाणारा निधी राजकीय कारणांसाठी खर्च होत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये याच पैशांच्या आधारे काँग्रेसमध्ये बंडखोरी घडवून आणली व तो कट मोदी आणि शाह यांनी रचला होता, असा काँग्रेसचा आरोप आहे.