नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांना नव्या सरकारचा शपथविधी पार पाडण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.राजकीय संकटाचा सामना करीत असलेल्या अरुणाचलमधील परिस्थिती जैसे थे ठेवण्यात यावी आणि नवे सरकार स्थापन करण्यास परवानगी देऊ नये, ही काँग्रेस नेत्यांनी केलेली विनंतीही न्या. जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेटाळून लावली. ‘आदेश देण्याबाबतचा तुमचा युक्तिवाद आम्ही ऐकला आहे. आम्ही कोणताही आदेश पारित करणार नाही आणि गुणवत्तेच्या आधारावर या प्रकरणाची सुनावणी करू,’ असे या घटनापीठाने स्पष्ट केले. या घटनापीठात न्या. दीपक मिश्रा, न्या. एम. बी. लोकूर, न्या. पी. सी. घोष व न्या. एन. व्ही. रामन्या यांचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अरुणाचल; काँग्रेसची विनंती फेटाळली
By admin | Published: February 17, 2016 2:53 AM