किबिथू/काहो (अरुणाचल प्रदेश) - सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.राज्याच्या सीमेवरील भागात भारतीयांच्या मोबाइलवर वेलकम टू चायना (चीनमध्ये तुमचे स्वागत आहे) असे संदेश येऊ लागले आहेत. भारतीय सीमेवर लष्कर वाढवल्यामुळे मात्र चीनने संबंध बिघडतील, असा इशारा भारताला दिला आहे.डोकलाम प्रश्नावरून भारत-चीनमधील वाद संपला असे वाटत असले तरी चीनच्या कागाळ्या सुरूच आहेत. भारतीयांच्या मोबाइलवर स्थानिक नव्हे, तर चिनी कंपन्यांचे नेटवर्क दिसत आहे. तसेच घड्याळातील वेळही अडीच तास पुढील म्हणजे चिनी टाइम झोनप्रमाणे दिसत असून, काही संदेश चीनमधील मँडरिनमध्ये भाषेतील आहेत. किबीथू व काहो हा अरुणाचल प्रदेशातील सीमेवरील भाग असून, त्या पलिकडे तिबेटचा भाग सुरू होतो. तिबेटप्रमाणेच अरुणाचल प्रदेश हाही आमचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे. हा सर्व भाग भारताचा असला तरी तिथे कसल्याही पायाभूत सोयी नाहीत. त्याचाच गैरफायदा चीन घेत आहे. किबीथूपर्यंत पोहोचण्यासाठी एकच रस्ता असून, तिथे सतत भूस्खलन होत असल्याने जवानांना तिथे पोहोचण्यात वा साधनसामग्री पोहोचवण्यात असंख्य अडचणी येतात. सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना ७0 किलोमीटर पायपीट करावी लागते. याउलट चीनने सीमेपलीकडे स्वत:च्या हद्दीतरस्ते व पूल बांधले आहेत. तसेच जवानांसाठी तीन मजली इमारतही बांधली आहेत.दूरसंचार यंत्रणा भक्कम असावी, यासाठी २00३ साली तिथे आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्यात आली होती. पण तिची सतत दुरुस्ती करावी लागते. परिणामी मोबाइल व टेलिफोन अनेकदा बंद असतात. तसेच मोबाइल सुरू होतात, तेव्हा बऱ्याचदा चीनचेच नेटवर्क दिसते.चीनचा इशाराबीजिंग : भारताने अरुणाचल प्रदेशच्या किबीथू भागातील सीमेवर आपली लष्करी कुमक वाढविल्यामुळे चीन संतापला आहे. भारताने अशा कागाळ्या करून, दोन देशांतील संबंध बिघडण्यास कारण बनू नये, असा अनाहूत सल्ला भारताला दिला आहे.भारत आपल्या भागातच सैन्य वाढवत असला, तरी त्यामुळे परस्पर विश्वासाला तडा जाईल, तसेच आर्थिक, राजनैतिक व सांस्कृतिक देवाण-घेवाणीवरही विपरित परिणाम होईल, असा इशारा चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्रातून देण्यात आला आहे.
अरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:07 AM