देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मात्र रविवारीच जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने ६० पैकी ४६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. मागच्या वेळपेक्षा भाजपाला काही जागा अधिक मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. एवढंच नाही तर काँग्रेसला ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे.
२०१९ मध्ये काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसला राज्यातील ६० पैकी केवळ १९ जागांवरच निवडणूक लढवता आली. याबाबत समोर येत असलेल्या कारणांनुसार पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना नॉमिनेट करण्याच्या पक्षाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. तर अनेक काँग्रेस नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यातून पळ काढला. अनेकजण भाजपामध्ये गेले. मात्र काँग्रेसने पूर्व कामेंग जिल्ह्यातील बामेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले कुमार वाय हे विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. या निवडणुकीत काँग्रेसचे विजयी झालेले ते एकमेव उमेदवार ठरले.
दरम्यान, काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची यादी तयार केली होती. मात्र यामधील १० जणांनी उमेदवारी अर्च भरला नाही. उर्वरित उमेदवारांपैकी ५ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कानुबारी लोकसभा मतदारसंघातील सोम्फा वांगसा यांनी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदावारी मागे घेत भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपासोबत कथितपणे हातमिळवणी केल्याच्या आरोपामुळे काँग्रेसने अनेक नेत्यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली. यामधील ९ जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आपण निवडणूक लढवत नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवत नसल्याची कल्पना पक्षाला दिली नाही. अखेरपर्यंत ते उमेदवारीसाठी झगडत होते. मात्र नंतर त्या्ंनी माघार घेतली. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी उमेदवारांच्या माघारीसाठी धनशक्ती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. आम्ही नक्कीच निराश झालोय. मात्र हताश झालेलो नाहीत. आम्ही पराभवाच्या कारणांचं आत्मपरीक्षण करू. तसेच पुन्हा एकदा पक्ष संघटनेवर काम करू, असे ते म्हणाले.