अरुणाचलमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्तीवर गेलेले सात जवान बेपत्ता झाले होते. या जवानांचे मृतदेह सापडल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
हिमस्खलनाची ही घटना कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगामध्ये घडली होती. रविवारी जवानांचे गस्ती पथक या भागात गस्तीसाठी निघाले होते. तेव्हाच हिमस्खलन झाल्याने हे जवान त्यामध्ये अडकले होते. या बेपत्ता जवानांचा शोध आणि मदतकार्यासाठी विशेषज्ञांची टीमला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आली होती. खराब हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून तिथे सतत बर्फवृष्टी होत आहे. यामुळे बचावकार्यातही अडथळे येत होते.
बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी हिमस्खलन झाल्याच्याही बातम्या आहेत. राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाड्या अडकल्या आहेत. हिमस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीवर जाणाऱ्या पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हिमस्खलनामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.