बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला जुना मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) राम-राम ठोकत राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत आघाडी करून नवे सरकार स्थापन केले आहे. यानंतर, भाजप जेडीयूवर सातत्याने विश्वासघात केल्याचा आरोप करत आहे. यातच, आता अरुणाचल प्रदेशातील JDU च्या एकमेव आमदाराला पक्षात प्रवेश देऊन भाजपने नितीश कुमारांना झटका दिल्याचे वृत्त आहे.
अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे एकमेव आमदार टेची कासो यांनी बुधवारी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे उपाध्यक्ष टेसम पोंगटे यांनी ईटानगरचे आमदार कासो यांचे भाजपतील प्रवेशासंदर्भातील पत्र स्वीकारले आहे. याच बरोबर आता 60 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 49 वर पोहोचली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने एकूण 15 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. यांपैकी सात जागांवर नितीश कुमारांच्या पक्षाला विजय मिळाला होता. अरुणाचलमध्ये जेडीयू भाजपनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र, 2020 मध्ये नितीशकुमारांच्या सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला होता.
अरुणाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेस आणि भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या एनपीपीचे प्रत्येकी चार-चार आमदार आहेत. याशिवाय तीन आमदार अपक्ष आहेत. त्यांनी सरकारला आपला पाठिंबा दिला आहे.