नवी दिल्ली - चिनी सैन्याचा लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Xiaomiच्या मोबाइल फोनमुळे हा वाद निर्माण झाला आहे. शाओमी च्या मोबाइलमधील वेदर अॅपवर अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने या वादाला तोंड फुटले आहे.शाओमीच्या वेदर अॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने सोशल मीडियावर चर्चेस सुरुवात झाली. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाशी या प्रकाराचा संबंध नेटीझन्सकडून जोडण्यात येत आहे. पूर्वोत्तर भारतातील राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनकडून सातत्याने दावा करण्यात येत असतो. तसेच चीनकडून अरुणाचल प्रदेशबाबत वारंवार कुरापती काढण्यात येत असतात.दरम्यान, सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव असतानाचा हा प्रकार समोर आल्याने सोशल मीडियावर संतापाचा वातावरण निर्माण झाले. शाओमीच्या वेदर अॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने Boycott Xiaomi चा ट्रेंड सुरू झाला. शाओमी कंपनी आपल्या अॅपमध्ये जाणीवपूर्वक अरुणाचल प्रदेश दाखवत नसल्याचा आरोप नेटिझन्सनी केला.तसेच शाओमी च्या वेदर अॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याचे स्क्रीन शॉट पोस्ट करण्यात येऊ लागले. तर अन्य स्मार्टफोन कंपन्यांच्या डिव्हाइसमध्ये मात्र अरुणाचल प्रदेश दिसत होता.दरम्यान, या सर्व वादावर शाओमी ची प्रतिक्रिया समोर आली आहे. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या या कंपनीने हा प्रकार म्हणजे सॉफ्टवेअर ग्लिच असल्याचे सांगितले. शाओमी स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले वेदर अॅप हे मल्टिपल थर्ड पार्टी डेटा सोर्सकडून डेटा कलेक्ट करते, असा दावा कंपनीने केला. त्यामुळे या अॅपमध्ये अनेक ठिकाणांसाठीचा डेटा उपलब्ध होत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.