अरुणाचल प्रदेशमध्येभारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर आली आहे. 9 डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाल्याची माहिती आहे. तसेच, या झटापटीत 20 ते 30 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये एलएसीजवळ चीनच्या पीएलएच्या सैनिकांनी आधी झटापट सुरू केली. यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. या झटापटीत 20 ते 30 जवान जखमी झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या या झटापटीत दोन्ही बाजूंच्या काही जवानांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर दोन्ही बाजूंनी तातडीने परिसरातून माघार घेतली. या झटापटीनंतर कमांडर्समध्ये फ्लॅग मिटिंग झाली.
याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.
गलवान नंतरची पहिली मोठी घटनादोन्ही देशांच्या सैन्यामध्ये 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या झटापटीत चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते.