देशात झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताच्या दिशेने कूच केली आहे. तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने निर्विवाद आघाडी घेतली आहे.
६० जागा असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये सत्ताधारी भाजपाने १० जागांवर आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर आज होत असलेल्या ५० जागांवरील मतमोजणीमध्ये भाजपाने आतापर्यंत २८ जागांवर आघाडी घेतली आहे. अरुणाचलमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे. मात्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये ३८ पेक्षा अधिक जागांवर भाजपा पुढे आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी ८, पीपल्स पार्टी अरुणाचल ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या दहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश आहे.
तर विधानसभा सदस्यसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य असलेल्या सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने निर्विवाद आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या ३२ जागा असलेल्या सिक्कीममध्ये ३० जागांसाठी मतमोजणी होत असून, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाने एका जागेवर आघाडी घेतली आहे. एकीकडे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने मोठी आघाडी घेतली असताना माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक नेते पिछाडीवर पडले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया शनिवारी आटोपली असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आता मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी काल प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ३५० ते ४०० जागा मिळतील, असा दावा बहुतांश एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे.