नवी दिल्ली : भारतीय लष्कराविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लेखिका अरुंधती रॉय यांनी माफी मागितली आहे. जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच 2011मध्ये अरुंधती रॉय यांनी केलेल्या वक्तव्याचा जुना व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन अरुंधती रॉय यांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, अरुंधती रॉय यांनी 'द प्रिंट'ला दिलेल्या मुलाखतील म्हटले आहे की, 'आपण सर्वजण आयुष्यात एखाद्यावेळी चुकून असे बोलतो, जे मुर्खपणाचे असते. चुकीचे असते. जर माझ्या या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असेल तर मी याबाबत माफी मागते.'
अरुंधती रॉय यांनी 2011 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, 'काश्मीर, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड यासारख्या राज्यामध्ये आपल युद्ध करत आहोत. 1947 पासून आपण काश्मीर, तेलंगना, गोवा, पंजाब, मणिपूर, नागालँडमध्ये लढत आहोत. भारत एक असा देश आहे, ज्याने लष्कराला आपल्या लोकांच्या विरोधात तैनात केले. पाकिस्तानने सुद्धा असे लष्काराला आपल्या लोकांविरोधात उभे केले नाही.'
याचबरोबर, पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी, काश्मीरमध्ये मुस्लीम, पंजाबमध्ये शीख आणि गोव्यात ख्रिश्चनांविरुद्ध भारतीय राज्ये लढत आहेत. असे वाटते जणू हा उच्चवर्णीय हिंदूंचाच देश आहे, असे अरुंधती रॉय यांनी म्हटले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून अरुंधती रॉय यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अरुंधती रॉय यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे अरुंधती रॉय यांनी अखेर माफी मागितली आहे.