लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल, अशी तरतूद करण्याची गरज आहे, अशी सूचना प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केली आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, राजा-महाराजांचा जमाना आता संपला आहे. एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता आले पाहिजे. एकदा हे पद भूषविल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला या पदावर काम करण्याची संधी द्यायला हवी. यावेळी त्यांनी कुणाही व्यक्तीचे नाव घेतले नाही. त्या म्हणाल्या, मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली असून सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा सारख्या बुद्धिजीवींना दहशतवादी ठरविले आहे. यूएपीए या कायद्याचा दुरुपयोग करून निरपराध व्यक्तींना अनेक महिन्यांपासून तुरुंगात कोंडले.
या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एनआरसीचा कायदाही मागे घ्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.