गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना दिल्लीतही आज महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यामुळे आपचे अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. गुजरातमध्ये लढायचे की दिल्लीत याची रणनिती आखताना केजरीवालांची दमछाक होणार आहे.
दिल्लीत राज्य निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे. यामध्ये एमसीडी निवडणुकीची तारीख घोषित केली जाऊ शकते. दिल्लीतील स्थानिक निवडणूक असली तरी त्याचा परिणाम हा दिल्लीपासून शेकडो किमी दूरवरील गुजरात निवडणुकीवर होऊ शकतो. गुजरातमध्ये जोरदार तयारी करणाऱ्या आपला दिल्लीतच ठाण मांडून बसावे लागले तर भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. एमसीडी निवडणूक ही दिल्लीच्या सत्तेची सेमीफायनल असल्याचे बोलले जाते. यामुळे केजरीवाल यांना महापालिका ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत ताकद लावावी लागणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आपने एवढी ताकद लावलेली नसली तरी गुजरातमध्ये केजरीवालांनी मोठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या ओपिनिअन पोलनुसार आपला ५० ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे केजरीवाल यांना जर दिल्लीतच रोखले तर भाजपासाठी ते फायद्याचे ठरणार आहे. एकाचवेळी तीन ठिकाणी प्रचाराची यंत्रणा राबविण्याएवढी आपची ताकद नाही. तेवढे नेते नाहीत. यामुळे केजरीवाल यांनाच या राज्यांत फिरावे लागणार आहे.
केजरीवालांनी गुजरातमध्ये आपली ताकद लावली आहे. परंतू, दिल्लीत निवडणूक लागली तर दिल्लीचा विधानसभेचा गड राखण्यासाठी एमसीडी निवडणूक आपसाठी महत्वाची ठरणार आहे. गुजरातमध्ये ३७ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. यामुळे भाजपाला सत्तेतून काढणे कठीण आहे. केजरीवालांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. दिल्लीत निवडणूक लागली तर केजरीवाल यांचे गुजरातवरून लक्ष विचलित होईल. तिकडे महापालिकांमध्येही केजरीवाल स्लोगन घेऊन आप प्रचारात उतरणार आहे.