नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एका रोड शो दरम्यान तरुणाने कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. याआधीही केजरीवालांसोबत असाच प्रकार घडला आहे.
केजरीवाल शनिवारी सायंकाळी मोतीनगरच्या परिसरात प्रचारासाठी रोड शो करत होते. यावेळी त्यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या कानाखाली लगावली. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे नाव सुरेश असल्याचे सांगितले जात आहे. तो कैलास पार्कमध्ये राहतो.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर असा हल्ला होण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही. एप्रिल 2016 मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेतच त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. हा व्यक्ती आम आदमी सेनेचा कार्यकर्ता वेदप्रकाश शर्मा होता.
तर फेब्रुवारी 2016 मध्ये लुधियानामध्ये केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉड आणि दांड्य़ांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती.जानेवारी 2016 मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. तसेच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. तसेच अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.