आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (28 जानेवारी) मोठी घोषणा केली. हरयाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत आप एकट्याने लढणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. हरयाणा विधानसभेच्या 90 जागांवर आप स्वबळावर लढणार असला तरी या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पंजाबमध्ये आपने लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणात इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहेत. बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. मात्र, हरयाणातील लोकसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी दरवाजे खुले ठेवले आहेत.
हरयाणातील जींद येथे 'आप'च्या 'बदलाव जनसभे'ला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज लोकांचा फक्त एकाच पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष. एका बाजूला त्यांना पंजाब दिसतो तर दुसरीकडे दिल्लीतील आमचे सरकार. आज हरयाणा एका मोठ्या बदलाची वाट पाहत आहे. आधी दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी हा मोठा बदल केला आणि आता तिथले लोक आनंदी आहेत. आप सर्व 90 जागांवर निवडणूक लढवणार असून हरयाणात आम्ही पुढचे सरकार स्थापन करू. या देशाचे नंबर 1 राज्य बनवले जाईल."
हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेमुळे इंडिया आघाडीसाठी अडचणीचे ठरले आहे. एकीकडे सर्व राज्यात आघाडी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्यात सामील असलेले पक्ष एका पाठोपाठ बाहेर पडत आहेत. पश्चिम बंगाल हे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणारे पहिले राज्य आहे, जिथे तृणमूल काँग्रेसने सर्व जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसने सांगितले आहे की, इतर राज्यांमध्ये पक्ष इंडिया आघाडीसोबत आहे.
पश्चिम बंगालनंतर पंजाबमध्येही आपने काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 13 जागांवर आप स्वबळावर लढणार असल्याचे सांगतिले जात आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून येथेही इंडिया आघाडीत तेढ निर्माण झाली होती. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे बिहारमधील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगली कामगिरी करणे कठीण जाणार आहे.
नितीश कुमार यांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.