नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने दिल्लीतील विद्यार्थ्यांना आणखी एक भेट दिली आहे. येथे शहीद भगतसिंग सैनिक भरती ट्रेनिंग शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेत ९ वी आणि ११ वी शाळेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. विशेष म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार असून सैन्य दलात भरती होण्यासाठीचं संपूर्ण प्रशिक्षण या शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही शाळा महत्वपूर्ण आणि दर्जात्मक असल्याचं म्हटलं आहे.
शहीद भगत सिंह आर्म्ड फोर्सेज प्रिपरेटरी स्कूल नावाने ही शाळा सुरु झाली असून येथे एनडीएमधील निवृत्त अधिकारी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. नेव्ही, एअरफोर्समध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळणार आहे. ही निवासी शाळा असून विद्यार्थ्यांना येथेच राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना येथे कुठलीही कमतरता जाणवणार नसून अभ्यासवर्गही चालवले जाणार आहेत.
या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एप्टीट्यूड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या फेरीत त्यांची मुलाखत घेतली जाईल. यंदा दोन्ही वर्गात प्रत्येकी १०० म्हणजेच २०० विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील. पहिल्याच वर्षासाठी १८ हजार विद्यार्थ्यांना अर्ज केला असून यातून केवळ १८० जणांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, सैन्य दलात भरती होण्याचं विद्यार्थ्यांचं स्वप्न येथून पूर्ण होणार आहे.