दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे नेते 7 एप्रिल 2024 रोजी जंतर-मंतरवर उपोषण करणार आहेत. आम आदमी पार्टीचे (आप) नेते गोपाल राय यांनी याबाबत माहिती दिली. "जर तुम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या विरोधात असाल, तर तुम्ही 7 एप्रिलला अटकेविरोधात उपोषण करू शकता. तुम्ही कुठेही, घरात, शहरात सामूहिक उपोषण होऊ शकता. 'आप'ला संपवण्याच्या उद्देशाने पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला अटक करण्यात आली आहे.
दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "अरविंद केजरीवाल यांना गंभीर डायबीटीस आहे. आरोग्याच्या समस्या असतानाही ते 24 तास देशसेवेत तत्पर राहिले. अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांचे वजन 4.5 किलोने कमी झाले आहे. हे खूप चिंताजनक आहे. आज त्यांना तुरुंगात टाकून भाजपा त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर संपूर्ण देश सोडा, देवही त्यांना माफ करणार नाही" असं आतिशी यांनी म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना येथे आणलं तेव्हा त्यांचं वजन 55 किलो होतं आणि आताही त्यांचं वजन 55 किलो आहे, असं तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे. तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, "तुरुंगात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांची शुगर लेव्हल नॉर्मल आहे."