Arvind Kejriwal Arrest: दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यामुळे आता 15 एप्रिलपर्यंत केजरीवालांचा मुक्काम दिल्लीच्या तिहार तुरुंगात असणार आहे. दरम्यान, तिहारमध्ये जाण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी तीन पुस्तकांची मागणी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात त्यांनी तीन पुस्तके तुरुंगात नेण्याची परवानगी मागितली आहे. या पुस्तकांमध्ये भगवद्गीता, रामायण आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या 'हाऊ प्राईम मिनिस्टर डिसायड्स' या पुस्तकाचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी जेलमध्ये काही आवश्यक औषधे, गळ्यातील धार्मिक लॉकेट आणि कारागृहात टेबल-खुर्ची देण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे.
पहिल्यांदाच आली आतिशी आणि सौरभ यांची नावेईडीच्या वतीने एएसजी राजू यांनी न्यायालयात सांगितले की, विजय नायर अरविंद केजरीवाल याच्या जवळचा आहे. केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, विजय नायर थेट मला भेटत नव्हते, ते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच या प्रकरणात आतिशी मार्लेन आणि सौरभ भारद्वाज यांची नावे आली आहेत.
आपचे इतर नेतेही तिहार तुरुंगातमिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार, हे अद्याप ठरलेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना तुरुंग क्रमांक दोनमधून तुरुंग क्रमांक पाचमध्ये हलवण्यात आले आहे. मनीष सिसोदिया यांना तुरुंग क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले आहे, तर सतेंद्र जैन यांना तिहार तुरुंगातील सात क्रमांकाच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. याशिवाय, बीआरएस नेत्या के कविता यांना लेडी जेल क्रमांक 6 मध्ये ठेवण्यात आले आहे.
ईडीने 21 मार्च रोजी अटक केले ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायाधीश बावेजा यांनी त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. यानंतर न्यायालयाने त्यांची कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली. आता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली मद्य धोरणातील मनी लॉड्रिंगचा मुख्य सूत्रधार केजरीवाल असल्याचा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांच्यासह अन्य मंत्री आणि आपचे नेतेही सहभागी झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह, हेदेखील याच प्रकरणात तुरुंगात आहेत.