Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी(दि.21) रात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने(ED) अटक केली. दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात ही अटक झाली आहे. आज त्यांना न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास तुरुंगात जावे लागेल. दरम्यान, केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील, असा दावा आम आदमी पक्षाचे सर्व नेते करत आहेत. परंतु, नियमांनुसार हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. अशा परिस्थितीत केजरीवालांना राजीनामा द्यावा लागू शकतो. आता प्रश्न असा पडतो की, जर केजरीवालांना तुरुंगवास झाला, तर त्यांच्या जागी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार?
केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी मार्लेना, यांनी केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ते मुख्यमंत्री आहेत आणि राहतील, जेलमधूनच सरकार चालवतील, असे आप नेत्यांचे म्हणने आहे. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनीही अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तुरुंगवास झाला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, अशी कायद्यात तरतूद नाही. पण, तुरुंगातून सरकार चालवल्याचे आतापर्यंत कधीही या देशात घडले नाही.
तुरुंगातून सरकार चालवणे शक्य नाहीतुरुंगाच्या नियमांनुसार, तुरुंगातून सरकार चालवणे सोपे नाही. मुख्यमंत्र्यांचे काम केवळ कागदपत्रे आणि फायलींवर सह्या करणे नसते. मुख्यमंत्री अनेक कामांसाठी जबाबदार असतात. यामध्ये अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे, कॅबिनेट बैठका घेणे आणि ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेणे समाविष्ट आहे. तुरुंगात असताना या सर्व गोष्टी व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाहीत. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार?
आपचे तीन नेते तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वीच आम आदमी पक्षाचे तीन मोठे नेते तुरुंगात आहेत. आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभा खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षासमोर आधीच नेतृत्वाचे संकट असून, आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे अडचण वाढली आहे. दरम्यान, अरविंद काजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागला, तर दिल्ली सरकारमधील आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज किंवा गोपाल राय, यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले जाऊ शकते.