दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी रात्री अटक केली आहे. जवळपास दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवाल यांना ईडी लॉकअपमध्येच रात्र काढावी लागली.
रिपोर्टनुसार, अरविंद केजरीवाल यांना रात्री नीट झोप येत नव्हती. रात्री त्यांना घरातून ब्लँकेट आणि औषधं देण्यात आली. याप्रकरणी केजरीवाल यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टातही सुनावणी होऊ शकते.
अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांना पदावर असताना ईडीकडून अटक झाली आहे. त्यांच्याआधी याच वर्षी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली होती. अटकेपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता.
दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ईडीने आतापर्यंत मुख्यमंत्री केजरीवाल यांना नऊ समन्स बजावले आहेत. गुरुवारी ईडीचे पथक दहाव्या समन्ससह त्यांच्या घरी पोहोचले.
अरविंद केजरीवाल इतके समन्स बजावूनही ईडीसमोर हजर झाले नाहीत. याच दरम्यान, केजरीवाल यांनी अटक टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तो फेटाळला होता.