Arvind Kejriwal Arrest: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज (21 मार्च) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केले. त्यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थकांडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, विरोधी नेतेही यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. केजरीवालांच्या अटकेवरुन राहुल गांधी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय बोचरी टीका केली.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. "घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे. प्रसारमाध्यमांसह सर्व संस्था ताब्यात घेणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे, प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवणे...या असुरी शक्ती' कमी पडल्या होत्या, म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेचे प्रकारही सर्रास वाढले आहेत. INDIA याला चोख प्रत्युत्तर देणार," अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.
प्रियंका गांधी यांचीही केंद्रावर टीकासीएम केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या घटनेला असंवैधानिक म्हटले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याविरोधात पोस्ट केली. "लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे. अशा प्रकारे राजकारणाची पातळी कमी करणे ना पंतप्रधानांना शोभते, ना त्यांच्या सरकारला."
"निवडणुकीच्या मैदानात उतरुन विरोधकांशी लढा, त्यांचा धैर्याने सामना करा, त्यांच्या धोरणांवर आणि कार्यशैलीवर टीका करा, हीच खरी लोकशाही आहे. परंतु अशाप्रकारे देशाच्या सर्व संस्थांचा वापर करून स्वत:चे राजकीय उद्दिष्ट पूर्ण करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. एका मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, आता दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू आहे. असे लाजिरवाणे दृश्य भारताच्या इतिहासात प्रथमच पहायला मिळत आहे," अशी टीका त्यांनी केली.