नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने रविवारी ९ तास चौकशी केली. सकाळी सव्वाअकरा वाजेपासून चौकशी सुुरु होती. रात्री ८.३० वाजता ते कार्यालयातून बाहेर पडले. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीत रणनीती ठरविण्यासाठी आपच्या नेत्यांनी दिल्लीत आपत्कालीन बैठक घेतली.
मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स पाठविल्याच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली शहरात विविध ठिकाणी तसेच सीबीआयच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. यात खासदार संजय सिंग, खासदार राघव चढ्ढा यांच्यासह अनेक आमदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. जवळपास २ हजारांवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आपच्या नेत्यांनी केला आहे.
सीबीआयच्या कार्यालयात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधीजी यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार राघव चढ्ढा उपस्थित होते.
न्यायाधीश, पत्रकारांना धमक्या - केजरीवालमोदी सरकार खूप ताकदवान आहे. त्यांना सत्तेचा एवढा अहंकार आला आहे की, त्यांना वाटते सत्तेच्या भरवशावर कुणालाही कारागृहात टाकता येते. न्यायाधीशांना धमक्या, पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत. मोदी सरकारला जे वाटते ते झाले पाहिजे, हा त्यांचा दुराग्रह आहे. सीबीआयच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देईन. काही चुकीचे केले नाही तर घाबरण्याचे काही कारणच नाही.
धरपकड...दिल्ली पोलिसांनी आपच्या नेत्यांची सकाळपासून धरपकड सुरू केली होती. आपच्या अनेक आमदारांना घराच्या बाहेर पडू दिले नाही. जे आमदार घराबाहेर पडले त्यांना लगेच ताब्यात घेतले. आपच्या ३२ आमदारांना अटक केल्याची माहिती कामगारमंत्री गोपाल राय यांनी दिली. याशिवाय अनेक नगरसेवकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील विविध ठिकाणी २ हजारांवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे गोपाल राय यांनी सांगितले.
चौकशी कोणत्या मुद्द्यांवर?मुख्यमंत्री केजरीवाल यांचे नाव आरोपपत्रात नाही. तरीही त्यांची चौकशी करण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. या घोटाळ्यातील आरोपी समीर महेंद्रू याने दिलेल्या कबुली जबाबात केजरीवाल यांच्या निर्देशाचा उल्लेख केला आहे. तसेच एका फोन कॉलमध्ये केजरीवाल यांनी या घोटाळ्यातील आरोपी विजय नायर याचा उल्लेख केला आहे. या दोन ठिकाणी केजरीवाल यांचा उल्लेख आल्याने प्रामुख्याने चौकशी होत आहे.