नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांची संख्या तब्बल 99,56,558 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे वाढवण्यात आले आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत निशाणा साधला आहे.
"योगी आदित्यनाथ यांना जागे असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं दिसते" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच "कोरोनासंदर्भातील आमच्या शानदार कामाची चर्चा ही उत्तर प्रदेशमध्ये होते. आम्ही तुमच्यासारख्या बोगस करोना चाचण्या करत नाही" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे. याआधी योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू कमी आहेत. कोरोना संसर्गाची साखळी प्रत्येत पातळीवर तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असं म्हटलं होतं. त्यावर आता केजरीवालांनी निशाणा साधला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीशी तुलना करत सरकारची कामगिरी मांडली आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे आणि 10 महिन्यांत 8 हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. दिल्लीची लोकसंख्या पावणेदोन कोटी असून करोनाने 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यूपीच्या कोविड व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. यूपीतील कोविड व्यवस्थापन ज्यांना दिसत नाही, त्यांनी सार्वजनिक स्थळावरून माहिती घ्यावी. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वसामान्यांच्या पाठिंब्याने हे सर्व शक्य झाल्याचं योगी आदित्यनाथ म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. जनआंदोलनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपूर्वी पार्टीची स्थापना करण्यात आली होती. तीन वेळा दिल्लीत सरकार स्थापन करण्यास पार्टीला यश मिळाले. याशिवाय, पंजाबमध्ये आपल्या पार्टीने मुख्य विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली आहे असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
आपच्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णयावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही" असं म्हणत भाजपाने अरविंद केजरीवाल आणि "आप"ला सणसणीत टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे 24 कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष सुंदर स्वप्नच पाहत आहे" अशा शब्दांत केशव प्रसाद मौर्य यांनी हल्लाबोल केला आहे.