दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठं विधान केलं आहे. कोणी कितीही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीची मशाल तशीच ठेवू, आम्ही कधीही ती विझू देणार नाही असं म्हटलं आहे. केजरीवाल यांनी किरारी विधानसभेत दोन नवीन सरकारी शाळांच्या पायाभरणीनंतर हा दावा केला आहे.
जनतेला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आजचा दिवस पवित्र आहे. निदान आज तरी गलिच्छ राजकारण करू नका. तुमचं केजरीवालांशी वैर आहे, जनतेच्या मुलांशी शत्रुत्व नको. त्यांची मुले शिक्षण घेणार आहेत. याप्रसंगी वाईट काम करू नका. आम्ही दिल्लीत कुठेही शाळा, दवाखाने किंवा इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी जातो तेव्हा आमचे विरोधक घटनास्थळी पोहोचतात आणि आरडाओरडा सुरू करतात."
अरविंद केजरीवाल य़ांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. "हे म्हणतात तुम्ही भाजपामध्ये आलात तर तुम्हाला सोडून देऊ. मी येणार नाही. मी का जाऊ? भाजपामध्ये आल्यास सर्व खून माफ होतील, पण आम्ही जाणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केजरीवाल म्हणाले की, "केंद्र आणि भाजपाने सर्व एजन्सी आमच्या मागे सोडल्या आहेत."
"तुम्ही मला तुरुंगात टाकलं तरी करोडो गरीब मुलांच्या पालकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या हव्या त्या कारस्थानापुढे मी झुकणार नाही. भाजपावाले म्हणतात आमच्या पक्षात या, सर्व खून माफ करू, आम्ही भाजपामध्ये जाणार नाही. तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या."