नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान, त्यांनी आपशी संबंधित अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. तत्पूर्वी मंगळवारी राहुल गांधी यांनीही आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला होता. झाडूचा सर्वात मोठा नेता दहशतवाद्यांच्या घरी दिसू शकतो. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान हे २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन करत आहेत, असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला सांगितला होता. कुमार विश्वास म्हणाले की, अरविंद केजरीवाल तेव्हा म्हणाले होते की, एकेदिवसी मी पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र देश असलेल्या खलिस्तानचा पंतप्रधान बनेन. मात्र त्यावेळी मी केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांना सोबत न घेण्याचा सल्ला दिला होता, असेही कुमार विश्वास म्हणाले.
दरम्यान राहुल गांधी यांनी मंगळवारी बरनाला येथे एका सभेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, काही असलं तरी काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचा घरी दिसणार नाहीत. मात्र झाडूचा सर्वात मोठा नेता दहशतवाद्याच्या घरी पाहता येऊ शकतो. हेच सत्य आहे. २०१७ निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे मोगामध्ये पूर्वाश्रमीच्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी थांबले होते, त्या आधारावर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे.