Swati Maliwal attacks Kejriwal: दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबमध्ये पोहोचले आहेत. पत्नी सुनीता केजरीवालसह होशियारपूरमधील आनंदगढ येथे 10 दिवसांच्या विपश्यना सत्रात सहभागी होत आहेत. स्वतःला 'आम आदमी', म्हणजेच साधा माणूस म्हणवारे केजरीवाल आपल्यासोबत भलामोठा ताफा घेऊन फिरत आहेत. त्यांच्या ताफ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरविंद केजरीवाल व्हीआयपी संस्कृतीला विरोध करायचे, पण पंजाबमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या वाहनांचा लांबलचक ताफा दिसला. माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या बंडखोर नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवालांची खरडपट्टी काढली.
डोनाल्ड ट्रम्पपेक्षा मोठा ताफा...स्वाती मालीवाल यांनी ताफ्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, अरविंद केजरीवाल जी पंजाबच्या जनतेला इतके घाबरतात का? व्हीआयपी संस्कृतीवर टीका करणारे केजरीवाल स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठे सुरक्षा कवच घेऊन फिरतात. पंजाबसारख्या महान राज्याला प्रत्येकाने आपल्या चैनीचे साधन बनवले, हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका मालीवाल यांनी केली.
सिरसा यांचीही केजरीवालांवर टीकाअरविंद केजरीवाल यांच्या ताफ्याबाबत भाजप आपला धारेवर धरत आहे. भाजप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, अशा विपश्यनेचा काय उपयोग, जिथे साधेपणा आणि आत्मपरीक्षणाऐवजी 50 वाहनांच्या ताफ्यात अहंकार आणि दिखावा दिसतो? अरविंद केजरीवाल यांचा हा खोटा साधेपणा, ही आणखी एक नौटंकी आहे. भ्रष्टाचार आणि अहंकारात बुडालेल्या माणसाला विपश्यनेचा खरा अर्थ कसा समजणार? जनता सर्व काही पाहते.
ताफ्यावर आपचे स्पष्टीकरणकेंद्रातील भाजप सरकारने केजरीवाल यांना सुरक्षा दिल्याचे आम आदमी पक्षाने सांगितले आहे. काँग्रेस आणि भाजप एकच आहे. अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाणार नाहीत किंवा ते पंजाबचे मुख्यमंत्रीही होणार नाहीत. भाजपचे लोक अफवा पसरवत आहेत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
दिल्लीत 'आप'चा दारुण पराभवनुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. 70 जागांपैकी 'आप'ला केवळ 22 जागा मिळाल्या, तर भाजपने 48 जागा जिंकून 27 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन केले आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि सोमनाथ भारती यांच्यासह आपचे अनेक बडे नेते पराभूत झाले.