राजधानी दिल्लीतील सुलतानपुरीमधील कंझावाला भागात घडलेल्या एका भयानक घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे. ज्यांनी या भयावह घटनेचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत त्यांचा थरकाप उडाला आहे. आरोपी पीडित तरुणीला चार किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले. त्यामुळे या दुर्घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी यावर भाष्य केलं आहे. पाच जणांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
ज्यांनी 20 वर्षीय तरुणीच्या स्कुटीला कारने धडक देऊन नंतर तिला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे. तसेच "महिलेसोबत जे घडले ते अतिशय लज्जास्पद असून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशी झाली पाहिजे" असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी कंझावाला येथील मुलीच्या मृत्यूसंबंधी उपराज्यपालांशी संवाद साधला.
केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, उपराज्यपालांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कंझावाला घटनेबाबत माननीय एलजी यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली की दोषींवर कारवाई करावी, त्यांच्याविरुद्ध आयपीसीची कठोर कलमे लावली जावीत. कठोर कारवाई करू, असे आश्वासन" दिल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या भयावह घटनेमधील जे पाच आरोपी आहेत. त्या आरोपींपैकी एकजण भाजपाच नेता आहे. त्याचं नाव मनोज मित्तल असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील सुलतानपुरी भागात त्याचं रेशनचं दुकान आहे. तसेच त्या परिसरात त्याचे पोस्टर्सही लावलेले दिसून येतात. ही धक्कादायक घटना जेव्हा घडली तेव्हा मनोज मित्तल हा कारमध्ये उपस्थित होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामध्ये सदर तरुणी बलेनो कारखाली अडकलेली दिसत आहे. तर कारचालक तिला फरफटत नेत यूटर्न घेताना दिसत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"