नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची अलीकडेच जामीनावर सुटका करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ते अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्रातील BJP सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा 'आप' पक्ष फोडण्याचा कट फसला, आमचे नेते एकजुटीने उभे आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे कारणही सांगितले.
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला?मनीष सिसोदिया यांनी हिंदी वृत्तवाहिनी टीव्ही 9 शी संवाद साधताना म्हटले की, 'मला राजीनामा दिल्याचा पश्चाताप नाही. मी राजकारणात खूप नंतर आलो. सुरुवातीला मी माझ्या पत्रकारितेच्या काळात रस्त्यावर उतरलो. माहितीच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राजकारणात आलो. राजकारणात आल्याचाही मला पश्चाताप नाही. जनतेच्या आशीर्वादानेच मला काही घटनात्मक पदे भूषवण्याची संधी मिळाली.'
राजीनाम्याच्या प्रश्नावर सिसोदिया म्हणाले की, 'एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार पडत नाही, त्याच्या जागी त्याचे काम दुसऱ्याला देता येते. पण, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तर सरकार पडते, सरकार बदलते. मी राजीनामा देणे आणि अरविंद केजरीवालांनी राजीनामा देणे, यात मोठा फरक आहे. माझ्या अटकेनंतर केजरीवालांनी शिक्षण क्षेत्रातील काम पुढे आतिशी यांना जबाबदारी दिली. अरविंद केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे, कुठेतरी सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.'
निवडणुकीपर्यंत तुरुंगात ठेवण्याचे षडयंत्र सिसोदिया पुढे म्हणतात, 'ड्रग्ज माफियांविरोधात जे गुन्हे दाखल होता, ते गुन्हे माझ्यावर दाखल केले. माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचले गेले. दिल्ली निवडणुकीपर्यंत मला तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे सरकार पाडायचे असेल, तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर पीएमएलए कलम लादून सरकार पाडा, ही अत्यंत वाईट परंपरा होत चालली आहे,' अशी टीकाही सिसोदियांनी यावेळी केली.