संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो आणि त्यांच्याभोवती पैशांचे ढीग असलेले पोस्टर दिल्लीच्या रस्त्यांवर लावून भाजपने लोकसभा निवडणुकीची सुरुवात केली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक रूप दाखवत त्याला पंतप्रधान मोदी यांच्या वन लीडर, वन नॅशनशी जोडले आहे. दिल्लीत सातही जागांवर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत तशी शांतता होती. मात्र अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्याने दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे.
केजरीवाल बाहेर येताच दिल्लीच्या रस्त्यांवर या पोस्टर्समध्ये केजरीवाल तुरुंगात बंद आणि त्यांच्याभोवती पैशांचा ढिगारा भाजपने दाखविला आहे. आम आदमी पार्टी केजरीवाल यांच्या सुटकेला मोठा विजय म्हणून दाखवित आहेत.
दिल्लीत भाजप आणि आप यांच्यातील लढत पाहणाऱ्या काँग्रेसमध्ये आता नवा उत्साह दिसून येत आहे. दिल्लीतील सातपैकी चार जागांवर आम आदमी पक्ष, तर तीन जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेसची आघाडी अजूनही नेतृत्वहीन होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये दाखल झाले. तर, आपचे सर्वांत मोठे नेते केजरीवाल तुरुंगात होते. त्यांच्या सुटकेनंतर आप आणि काँग्रेसमध्ये उत्साह दिसत आहे.
केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रयोग अयशस्वी : भाजपची टीका
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रयोग अयशस्वी ठरल्याचे सांगत म्हटले आहे की, केजरीवाल यांच्यासह त्यांचे अर्धे नेते तुरुंगात आहेत. केजरीवाल यांनी त्यांचे गुरू अण्णा हजारे यांच्या बाबतीत काय केले? मद्य घोटाळ्यानंतर अण्णा हजारे यांनीच केजरीवाल यांना पत्र लिहून त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे म्हटले होते. केजरीवालांचे आंदोलनातील साथीदार ॲडमिरल रामदास, किरण बेदी, कुमार विश्वास, प्रशांत भूषण यांनी त्यांना का सोडले? केजरीवाल यांच्या सुटकेचा आनंद साजरा करणाऱ्या आपला त्यांनी आठवण करून दिली की, केजरीवाल आरोपातून मुक्त झालेले नाहीत. ते जामिनावर सुटले असून, त्यांना २ जूननंतर पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.