ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना जोरदार झटका दिल्यानंतर आम आदमी पक्षाने आपली रणनिती बदलली आहे. यापुढे दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य न करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे.
थेट मोदींवर हल्लाबोल करण्याऐवजी आम्ही पॉझिटिव्ह कॅम्पेनवर भर देणार आहे. 2015 दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही पॉझिटिव्ह कॅम्पेनवर भर दिला होता. तीच रणनिती आता दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अवलंबणार आहोत. दिल्लीमध्ये आपचे सरकार असताना 49 दिवसात काय बदल झाला ते मतदारांच्या मनावर बिंबवले होते. तसाच प्रचार आता करणार आहोत असे आप नेत्याने सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या दोन्ही राज्यातील मतदार दिल्लीमध्ये मोठया संख्येने आहेत हे सुद्धा मोदींना टार्गेट न करण्यामागचे एक कारण आहे. दिल्लीत थेट मोदींनी लक्ष्य करणे उलटू शकते असे आप नेत्याने सांगितले.