मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीया वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इंदिरा गांधींप्रमाणे अतिरेक करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझं हजारो लोकांशी बोलणं झालंय. जनतेमध्ये रोष आहे. भाजपावाले काय करत आहेत, असा सवाल जनता विचारत आहे. वाटेल त्यांना तुरुंगात टाकतात. आम आदमी पक्षाला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हापासून आम्ही पंजाबमध्ये जिंकलोय. ते यांना सहन होत नाही आहे. आम आदमी पक्ष एक वादळ आहे. ते आता थांबणार नाही. आता आम आदमी पक्षाची वेळ आली आहे. ती आता थांबणारी नाही. आम्ही डोर टू डोर कॅम्पेन चालवणार आहोत. एके काळी इंदिरा गांधी यांनी अति केली होती. आता पंतप्रधान करत आहेत. आता वरचा आपली झाडू चालवणार.
मनीष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही मंत्र्यांचा देशाला अभिमान आहे. त्यांनी देशामध्ये दिल्लीचं नाव उंचावलं आहे. सत्येंद्र जैन यांनी जगाला आरोग्याचं नवं मॉडेल दिलं. तर सिसोदिया यांनी जगाला शिक्षणाचं मॉडेस दिलं. ज्यांनी नाव उंचावलं, त्यांनाच पंतप्रधानांनी तुरुंगात टाकलं. मद्य धोरण हे केवळ एक निमित्त आहे. हे सगळं बनावट आहे, असा घणाघात केजरीवाल यांनी केला.
चांगलं काम थांबवावं, ही पंतप्रधानांची इच्छा आहे. जे काम आम्ही करतो, ते ते करू शकत नाहीत. त्यांची सरकारं ज्या ज्या ठिकाणी आहेत, तेथील शाळांची स्थिती ते सुधारू शकले नाहीत. एक रुग्णालय दुरुस्त करू शकले नाहीत. त्यामुळेच ते केजरीवालला रोखण्याचं काम करत आहेत.