नवी दिल्ली - दिल्लीच्या विकासासाठी विस्तारीत नियोजनाची आवश्यकता आहे. त्यासाठी दिल्लीत असं सरकार हवं आहे, जे केंद्राच्या सोबतीने काम करेल, असं मत दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजय गोयल यांनी व्यक्त केले. तसेच पुढील सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर निश्चित असून केजरीवाल यांनी दिल्ली सोडून जाण्याची तयारी करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीत वरिष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात विजय गोयल बोलत होते. ते म्हणाले, दिल्ली सरकार म्हणतं की, केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेपेक्षा चांगली योजना दिल्लीत सुरू आहे. मात्र त्या योजनेसोबत आयुष्यमान भारत योजना लागू केल्यास दिल्लीतील जनतेला दोन-दोन योजनांचा लाभ घेता येईल. यात दिल्ली सरकारला अडचण असण्याचे कारण काय, असा सवालही गोयल यांनी उपस्थित केला.
दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत. दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ३ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून आयुष्यमान भारत योजना लागू करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्युत्तर केजरीवाल यांनी दिल्ली सरकारची योजना उत्तम असून आयुष्यमान भारत योजना लागू करण्यास नकार दिला होता.
दरम्यान पुढील सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर होणार असून आम आदमी पक्ष पराभूत होणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी आताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शरण जावे असा टोला विजय गोयल यांनी लागवला.