नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर ते मंत्रिपदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करत स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, काळ्या पैशाचे मालक सत्येंद्र जैन यांना केजरीवाल का वाचवत आहेत? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.
बुधवारी पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना चांगलेच घेरले. सत्येंद्र जैन हे भ्रष्ट व्यक्ती असून त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी क्लीन चिट दिली आहे. अरविंद केजरीवाल त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत?, सत्येंद्र जैन यांनी 4 शेल कंपनीच्या कुटुंबाच्या मदतीने आणि हवाला ऑपरेटरच्या मदतीने 2010 ते 2016 या काळात मनी लाँड्रिंग केल्याचे अरविंद केजरीवाल नाकारू शकतात का? असे सवाल स्मृती इराणी यांनी केले. तसेच, त्या म्हणाल्या की, सत्येंद्र जैन यांनी मनी लाँड्रिंग केल्याचे खंडपीठाने पुष्टी केली आहे.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, काल अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, भ्रष्टाचार म्हणजे देशाशी विश्वासघात, मग तुम्ही देशाच्या गद्दारांना आश्रय देत आहात का? न्यायालयाने सत्येंद्र जैन यांची भूमिका जाहीर केल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही का? 2019 मध्ये न्यायालयाने हा आदेश दिला होता, आजवर सत्येंद्र जैन यांच्याकडे काळा पैसा असल्याचे अरविंद केजरीवाल यांना माहीत होते, तरीही अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? सत्येंद्र जैन यांचा घोटाळा ही अरविंद केजरीवालांची मजबुरी आहे का? दिल्ली उच्च न्यायालय हा राजकीय पक्ष आहे का?, असे सवाल करत स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीने 5 एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता थेट अटकेची कारवाई झाल्याने केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?सत्येंद्र जैन यांनी 2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत.
मी स्वत: प्रकरणाचा अभ्यास केला, हे पूर्णपणे फेक आहे - केजरीवालसत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील प्रकरण पूर्णपणे फेक असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले होतो. याचबरोबर अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, "तुम्ही पंजाबमध्ये एका राज्यमंत्र्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकले होते ज्याची कोणत्याही तपास संस्थेला किंवा विरोधी पक्षाला कल्पना नव्हती. आम्ही हवं असतं तर ते दडपून टाकू शकलो असतो, पण आम्ही स्वतःहून त्याच्यावर कारवाई सुरू केली आणि त्याला अटक केली. मी स्वत: सत्येंद्र जैन यांच्यावरील खटल्याचा अभ्यास केला आहे. ते प्रकरण पूर्णपणे फेक आहे आणि त्यांना राजकीय कारणांसाठी हेतुपुरस्सर गोवण्यात आले. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील."