ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातील एक मंत्र्याला घरचा रस्ता दाखवला आहे. संदीप कुमार या मंत्र्यासंबंधित एक सेक्स टेप समोर आली आहे. त्यामुळे केजरीवालांनी त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. संदीप कुमार यांच्याकडे बालकल्याण आणि सामाजिक न्याय ही खाती होती. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील तिस-या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.
2015मध्ये झालेल्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. या सर्व प्रकरणावर केजरीवाल मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. "आम्हाला संदीप कुमार यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह सिडी सापडली आहे. सिडी पाहिल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांची हकालपट्टी केली आहे. आम आदमी पार्टीमध्ये भ्रष्टाचार आणि निंदनीय कृत्यांना थारा नाही."
"आम आदमी पार्टी ही शून्य टक्के भ्रष्टाचारावर काम करते. आमच्या जवळ 67 आमदार आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत," असा इशाराही मनीष सिसोदिया यांनी दिला आहे. याआधीही असिम अहमद खान आणि जितेंद्र सिंग तोमर यांनाही मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं होतं.