नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर दिल्लीत राजकीय खळबळ उडाली आहे. मद्य घोटाळ्यात सीबीआयच्या कारवाईला विरोधक विरोध करत आहेत. त्याचवेळी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा देऊन सर्वांनाच चकित केले आहे. दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याने नव्या राजकीय चर्चेला पेव फुटले आहे.
मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर व राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केजरीवाल खूप दिवसांपासून मनीष सिसोदिया यांना हटवण्याच्या प्रयत्न करत होते. पण भ्रष्टाचारात अडकवून असे हटवतील, असे वाटले नव्हते, अशा आशयाचे ट्विट अलका लांबा यांनी केले आहे.
याआधी काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, लवकरच आम्ही दिल्लीचा 'महा ठग' (मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल) अंमलबजावणी संचालनालयासोबत पाहू शकतो. मनीष सिसोदिया यांची सीबीआयने चौकशी केली यावर बोलताना त्या म्हणाल्या की, "ते तुरुंगात जातील" आणि असा दावाही केला की, "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे दारू माफियांशी थेट संबंध आहेत."
दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या पदांचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यांचा राजीनामा आता दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मनीष सिसोदिया यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात सीबीआयने रविवारी अटक केल्यानंतर दोन दिवसांनी ही घटना घडली आहे. तर सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत.