आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारु घोटाळ्यामध्ये तुरुंगात गेले आहेत. केजरीवाल यांना २१ मार्चला ईडीने अटक केली होती, सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. अशातच गेल्या सहा महिन्यांपासून दारु घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामिन मिळाला आहे.
यामुळे संजय सिंह राजकीय घडामोडींमध्ये, आपच्या प्रचारामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने संजय सिंह यांच्या जामिन अर्जावर सुनावणी घेतली होती. यामध्ये संजय सिंह यांना आतादेखील तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे, असा सवाल खंडपीठाने ईडीला विचारला होता. यावर सिंह यांच्या वकिलांनी पैशांच्या अफरातफरीचे काहीच सिद्ध करू शकले नाहीत, तसेच मनी ट्रेलही दाखवू शकले नाहीत, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.
संजय सिंह यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक आणि रिमांडविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. यामध्ये खंडपीठाने सिंह यांच्याकडून कोणतेही पैसे जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच त्यांच्यावरील दोन कोटींची लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते, असे नमूद केले. ईडीच्या वकिलांनी आपण त्यांना सूट देऊ शकतो असे म्हटले होते.
संजय सिंह यांना गेल्या वर्षी ४ ऑक्टोबरला ईडीने अटक केली होती. हायकोर्टात ईडीने सिंह यांच्या जमिन अर्जाला विरोध केला होता. यानंतर तीन महिन्यांनी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी मी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे, परंतु आजवर मला गुन्हा काय आहे आणि माझी त्यात भुमिका काय आहे, हे देखील सांगितले गेल नाहीय, असे म्हटले होते.