दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कथित फुटीरतावादी वक्तव्याच्या दाव्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांना दिले. चरणजित सिंग चन्नी यांनी मोदींना उद्देशून कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार का? असे पत्र लिहिले होते. यावर शहा यांनी उत्तर दिले.
चन्नी यांनी ट्विटद्वारे मागणी केली होती की, ''पंजाबचा मुख्यमंत्री या नात्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, कुमार विश्वास यांनी अलीकडेच जे काही बोलले आहे त्याची निष्पक्ष चौकशी करावी. राजकारण बाजूला ठेवा, पंजाबच्या जनतेने फुटीरतावादाशी लढताना मोठी किंमत मोजली आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक पंजाबीच्या चिंतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.''
याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी सीएम चन्नी यांना पत्र लिहिले आहे की, “एखाद्या राजकीय पक्षाने देशविरोधी, फुटीरतावादी आणि बंदी घातलेल्या संघटनेशी संपर्क साधणे आणि अखंडतेच्या दृष्टिकोनातून निवडणुकीत सहकार्य करणे अत्यंत गंभीर आहे. अशा घटकांचा अजेंडा देशाच्या शत्रूंच्या अजेंड्यापेक्षा वेगळा नाही. असे लोक सत्ता मिळवण्यासाठी पंजाब आणि देश तोडण्यासाठी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यापर्यंत जाऊ शकतात हे अत्यंत निंदनीय आहे.''
"या विषयावर मी तुम्हाला आश्वासन देतो की देशाच्या एकता आणि अखंडतेशी खेळू देणार नाही. भारत सरकारने हे गांभीर्याने घेतले आहे आणि मी स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे'', असेही पुढे शहा म्हणाले.
कुमार विश्वास यांनी अलीकडेच आरोप केला होता की अरविंद केजरीवाल यांनी त्यांना सांगितले होते की एक दिवस ते पंजाबचे मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र राष्ट्राचे (खलिस्तान) पहिले पंतप्रधान होतील. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार कवी विश्वास यांच्या वक्तव्यानंतर त्यांना सुरक्षा देऊ शकते.