नवी दिल्ली: पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थांबणार आहे. राज्यातील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'मी जर दहशतवादी असेल, तर मला 10 वर्षांत अटक का केली नाही?', असा सवाल त्यांनी केला.
'10 वर्षे मला अटक का केली नाही?'केजरीवाल म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खलिस्तानी समर्थक असल्याचे आरोप लावले जात आहेत. माझा देशाचे तुकडे करण्याचा वाड असल्याचे बोलले जात आहे. जर मी खलिस्तानी समर्थक किंवा दहशतवादी असेल, तर मग मागील 10 वर्षांपासून माझ्यावर कारवाई का केली नाही? मी 10 वर्षांपासून कट रचत होतो, हे तुम्हाला माहीत आहे, मग मला अटक का केली नाही? सुरुवातीचे तीन वर्षे काँग्रेसची आणि 7 वर्षे मोदीजींची आहेत. मोदीजी काय झोपले होते का? एजन्सी झोपली होती? मला अटक का झाली नाही? राहुल गांधी यांचेही तीन वर्षे सरकार होते. मला अटक का केली नाही?', असे प्रश्न केजरीवालांनी विचारले.
'नरेंद्र मोदी-राहुल गांधी एकच'ते पुढे म्हणाले, 'सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. सर्व लोक एकच भाषा बोलत आहेत. मोदीजी राहुल गांधींना गांभीर्याने घेत नव्हते, तेच आता त्यांना गांभीर्याने घेत आहेत. मोदीही आता राहुल गांधीसारखे झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
'कुमार विश्वास यांनी विनोदी कविता केली असेल'यावेळी केजरीवालांनी कवी कुमार विश्वास यांच्यावरही निशाणा साधला. कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर थेट खलिस्तानचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यावर केजरीवाल म्हणाले की, 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, त्यांनी एखादी विनोदी कविता केली असावी. पण, विरोधी पक्षनेत्यांनी ही कविता गांभीर्याने घेतली. कुमार कवी आहे, तो काहीही बोलू शकतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.