देशामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केजरीवाल यांनी सीएएला विरोध केल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू आश्रितांनी काल अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर केजरीवाल या आश्रितांवर संतप्त झाले आहेत.
केजरीवाल यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना या आंदोलकांबाबत लिहिलं की, या पाकिस्तान्यांची एवढी हिंमत? आधी यांनी आमच्या देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. आमच्या देशाचा कायदा मोडला. यांची रवानगी तुरुंगात झाली पाहिजे होती. आता यांची एवढी हिंमत झाली आहे की हे आमच्या देशामध्ये आंदोलन करत आहेत. गोंधळ घातल आहेत. सीएए लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशी पसरतील आणि लोकांना त्रस्त करतील. भाजपा यांना आपली व्होटबँक बनवण्याच्या स्वार्थापायी संपूर्ण देशाला अडचणीत लोटत आहेत, अशी घणाघाती टीका केजरीवाल यांनी केली.
केंद्र सरकारने सीएए लागू केल्यानंतर केजरीवाल यांनी या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा कायदा लागू झाल्यानंतर १९४७ पेक्षा मोठं स्थलांतर होईल. पाकिस्तानमधील लोक भारतात येतील. हे कितपत सुरक्षित असेल. चोरी, बलात्कार, दरोडे आणि दंगे वाढतील. जर तुमच्या घराजवळ पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेले लोक झोपड्या बांधून राहू लागले तर तुम्हाला आवडेल का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सीएएच्या मुद्द्यावरून वारंवार प्रश्न उपस्थित करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचार उघड झाल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तोल ढळला आहे. हे सर्व लोक भारतात आलेले आहेत, भारतातच राहत आहे. केवळ त्यांना अधिकार मिळालेला नाही. तो अधिकार त्यांना द्यायचा आहे, हे अरविंद केजरीवाल यांना माहिती नसावं, असा टोला अमित शाह यांनी लगावला.