नवी दिल्ली - दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली होती. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले होते. मात्र आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशुद्ध पाण्याच्या मुद्द्यावरून पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याचं म्हणत केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान दिलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी 'पाण्यावरून राजकारण होत आहे. 11 ठिकाणच्या नमुन्यांच्या आधारे कोणत्याही शहरातील पाण्याला खराब ठरवलं जाऊ शकत नाही. पाण्याचे नमुने कोणत्या ठिकाणचे आहेत हे सांगितलं जात नाही. रिपोर्टमध्ये 2 टक्के पाण्याचे नमुने हे फेल झाले आहेत. दिल्लीमध्ये 1500 ते 2000 पाण्याचे नमुने घेण्यात येतील. दिल्लीतील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे पाहण्यासाठी रामविलास पासवान यांनी यावं आणि तपास करावा असं आव्हान देतो' असं म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. तसेच गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली होती. मात्र आता प्रदूषण कमी झाल्याने याची गरज नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी रामविलास पासवान यांनी आम्ही कोणत्याही सरकारला दोष देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे. देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.