नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर आज काही लोकंनी हल्ला केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. 'काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडफोड केली. या हल्ल्यामागे भाजपचा हात असून, भाजपला अरविंद केजरीवालांना ठार मारायचे आहे', असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
मनीष सिसोदिया यांचा भाजपवर आरोपदरम्यान, या हल्ल्यानंतर आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर या हल्ल्याचा आरोप लावला आहे. 'भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली. भाजपच्या पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारापर्यंत आणले. पोलिसांची सुरक्षा असताना अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कोणी पोहोचू कसे शकतात? हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला. आम्हाला निवडणुकीत पराभूत करू शकले नाही, म्हणून आता केजरीवालांना मारायची योजना आखत आहेत, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
संजय सिंह यांचा इशारा...आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही ट्विट करुन भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिले आहे की, 'लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना रोखण्याऐवजी दिल्ली पोलीस त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहेत. भाजपवाले लक्षात ठेवा, सर्वांचा हिशोब घेतला जाईल, ही लोकशाही आहे, इथे वेळ आल्यावर लोक तुम्हाला मतांच्या लाठ्या मारतील.'
नेमके काय घडले?दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याविरोधात भाजपकडून केजरीवालांविरोधात निदर्शने सुरू होते. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्हीसह अनेक वस्तुंची तोडफोड केली. 150 ते 200 कार्यकर्ते केजरीवालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी आले. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक 2 बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पोहोचले आणि घोषणाबाजी करू लागले. आंदोलकांसोबत एक पेंट बॉक्सही होता, त्यांनी निवासस्थानाच्या गेटवर लाल रंग फासला, बूम बॅरिअर आणि सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. यानंतर पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले.