नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एलएनजेपी रुग्णालयात दाखल माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची भेट घेतली. मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर दोन्ही नेत्यांची रुग्णालयात ही पहिलीच भेट होती. यावेळी आपल्या पक्षाच्या नेत्याला भेटून आनंद झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची गळाभेट घेतली. तसेच, त्यांनी ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर करत सत्येंद्र जैन यांचा हिरो आणि शूर व्यक्ती असा उल्लेख केला आहे.
दिल्ली सरकारमधील माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये चक्कर आल्याने ते खाली कोसळले होते. या घटनेनंतर उपचारासाठी त्यांनी आधी डीडीयू रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले.
सत्येंद्र जैन यांना 30 मे 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. प्रकृतीच्या समस्येचे कारण देत त्यांनी अनेकवेळा जामीन मागितला होता. गुरुवारी तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 42 दिवसांचा जामीन मंजूर केला आहे.
सत्येंद्र जैन यांची भेट घेण्यापूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी मिळताच अरविंद केजरीवाल यांनी यांनी ट्विट केले होते की, "जी व्यक्ती जनतेला चांगले उपचार आणि आरोग्य देण्यासाठी रात्रंदिवस झटत होती, त्या चांगल्या व्यक्तीला एक हुकूमशहा मारायला झुकला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार आहे - प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त 'मी' मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. पण देव सर्व पाहत आहे, तो न्याय देईल. सत्येंद्र जैन लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो."