Delhi News: आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शुक्रवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आमची संघटना आणि कार्यकर्ते, हीच आम आदमी पार्टीची सर्वात मोठी ताकद आहे. केंद्र सरकार मला तुरुंगात टाकण्याची योजना आखत आहे,' असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला.
'तुरुंगाची भीती वाटत नाही'केजरीवाल पुढे म्हणतात, 'आम्ही तुरुंगात जाण्यास घाबरत नाही. मी 15 दिवस तुरुंगात राहून आलोय, तिथे चांगली व्यवस्था असते, त्यामुळे तुम्हीही(उपस्थित कार्यकर्ते) तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका. सरदार भगतसिंग इतके दिवस तुरुंगात राहिले, मनीष सिसोदिया 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत, सत्येंद्र जैन एका वर्षापासून तुरुंगात आहेत, त्यामुळे आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही,' असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
'आम्हाला सत्तेचा लोभ नाही''आम्हाला सत्तेची लालूच नाही, मी 49 दिवसांत राजीनामा दिला होता. मला वाटते की मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे, ज्याने 49 दिवसांत स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला होता. मी माझा राजीनामा बुटाच्या टोकावर घेऊन फिरतो. मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा लोभ नाही. राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायचे, याबाबत मी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहे. माझ्या सर्व आमदार आणि नगरसेवकांशीही चर्चा केली होती, आता आज माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो.'
'जनतेच्या इच्छेशिवाय काहीही करणार नाही''मी तुमच्यावर जबाबदारी टाकत आहे. दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले आहे. दिल्लीच्या जनतेच्या इच्छेशिवाय आम्ही काहीही करणार नाही. दिल्लीत घरोघरी जाऊन जनतेला विचारणार आहोत की, आम्ही काय करावे? आम्ही अवघड परिस्थितीत आहोत. येत्या 10-15 दिवसात आम्हाला दिल्लीतील प्रत्येक घरात जाऊन जनतेला विचारणार की, आम्ही राजीनामा द्यावा किंवा तुरुंगातून सरकार चालवावे? जनता जे म्हणेल, ते आम्ही ते करू,' असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.