केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार पलटवार केला आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि पंजाबमधील जनता काय पाकिस्तानी आहे का? असा सवाल विचारला आहे. तसेच यावेळी त्यांनी दावा केला की, 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.
आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, "लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत. आता मोदी सरकार 4 जूनला जाणार असून इंडिया आघाडी सरकार येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेकांनी सर्वेक्षण केले असून त्यात इंडिया आघाडीला स्वबळावर 300 हून अधिक जागा मिळतील, असं समोर आले आहे."
गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर केजरीवाल यांनी पलटवार करत देशातील जनता पाकिस्तानी आहे का, असा सवाल केला. "काल गृहमंत्री अमित शाह दिल्लीत आले होते. यावेळी अमित शाह यांनी जनतेला शिवीगाळ केली. अमित शाह म्हणाले की, 'आप'चे समर्थक पाकिस्तानी आहेत. दिल्लीतील जनतेने 56 टक्के मतदान करून आम्हाला 62 जागा दिल्या. दिल्लीचे लोक पाकिस्तानी आहेत का? पंजाबच्या जनतेने आम्हाला 117 पैकी 92 जागा दिल्या, पंजाबचे लोक पाकिस्तानी आहेत का?"
"गुजरातच्या जनतेने आम्हाला 14 टक्के मतदान केले, मग इथले लोकही पाकिस्तानी आहेत का? गोव्याच्या जनतेने प्रेम दिले तर ते लोक पाकिस्तानी आहेत का? आम आदमी पक्षाला पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत यूपी, आसाम, मध्य प्रदेशसह देशातील अनेक भागांत पाठिंबा मिळाला. आमचे नगराध्यक्ष, सरपंच निवडून आले. अशा परिस्थितीत देशातील सर्व लोक पाकिस्तानी आहेत का?" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. "काल योगी आदित्यनाथ यांनीही मला शिवीगाळ केली. मी म्हणतो, तुमचे खरे शत्रू तुमच्या पक्षात बसले आहेत. मला शिव्या देऊन काय होणार आहे? नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तुम्हाला मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा प्लॅन केला आहे" असं देखील अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.