नवी दिल्ली : भाजपा जेल-जेलचा खेळ खेळत आहे. आधी त्यांनी मला जेलमध्ये टाकलं, आज माझ्या पीएला जेलमध्ये टाकलं. आम्ही दिल्लीत चांगले काम केले आहे, त्यामुळेच त्यांना जेलमध्ये टाकायचे आहे. जे काम ते करू शकत नाहीत, ते आम्ही करत आहोत, असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपाला इशारा दिला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधांना सांगू इच्छितो की तुम्ही जेल-जेलचा खेळ खेळताय. मी उद्या १२ वाजता भाजपा कार्यालयात येत आहे. तुम्हाला ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे, त्यांना तुरुंगात टाका. हे लोक आम आदमी पक्षाच्या मागे लागले आहेत. एकामोगामाग एकाला हे तुरुंगात टाकत आहेत. संजय सिंहांना तुरुंगात टाकलं, आज माझ्या पीएला टाकलं. आता हे म्हणतात की राघव चढ्ढा यांनाही जेलमध्ये टाकणार. सौरभ, अतिशी यांनाही तुरुंगात टाकणार. आमचा काय दोष? आमच्या लोकांना तुरुंगात का टाकले जात आहे? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
आमचा गुन्हा एकच की, आम्ही सरकारी शाळा चांगल्या तयार केल्या. आम्ही गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले. हे लोक तसं करू शकले नाहीत. त्यामुळे दिल्लीतील सरकारी शाळा यांना बंद करायच्या आहेत. तसेच, दिल्लीकरांसाठी आम्ही मोहल्ला क्लिनिक बनवले, सरकारी रुग्णालये बनवली, चांगल्या सरकारी उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली. भाजपा हे करू शकली नाही. त्यामुळे ते मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी रुग्णालये बंद करू इच्छित आहेत. तसेच, पूर्वी दिल्लीत १०-१० तास वीज भारनियमन असायचे. आम्ही २४ तास वीज दिली. आम्ही दिल्लीकरांना मोफत वीज दिली, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
विभव कुमार यांना अटकस्वाती मालीवाल यांच्यासोबत कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी (१८ मे) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले. विभव कुमार यांनी आपल्या वकिलामार्फत ३० हजार रुपयांच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे.