मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याने आता पुन्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे. सुकेशने आता पाचवे पत्र जारी करून मुख्यमंत्री केजरीवाल आणि सतेंद्र जैन या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत. "केजरीवालजी, जर मी महाठग आहे, तर तुम्ही मला दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआरची व्यवस्था करण्यास का सांगितले?, असा सवाल सुकेशने या पत्रात केला आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूजसाठी ८ लाख ५० हजार डॉलर्स आणि १५ टक्के अतिरिक्त कमिशन देण्यात आल्याचा दावा सुकेशने केला आहे. "आजपर्यंत कोणीही केले नाही, असे प्रमोशन व्हायला हवे. आधी संपूर्ण पैसे अमेरिकन खात्यात टाकण्यास सांगितले होते, पण नंतर सतेंद्र जैन यांनी संपूर्ण पेमेंट रोख देण्यास सांगितले. माझ्याकडून तुम्ही पैसे व्हाईट केले, असंही या पत्रात म्हटले आहे.
"मी माझ्या स्वत:च्या पॉलीग्राफ चाचणीसाठी तयार आहे. मी केलेले सर्व आरोप अगदी बरोबर आहेत. जर तुम्ही बरोबर असाल तर केजरीवाल आणि सतेंद्र जैन यांना तुमची पॉलीग्राफ चाचणी करण्यात काही अडचण नसावी, असं या पत्रात म्हटले आहे.
मी आपल्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे देण्यासही तयार असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. "आम्हा तिघांची मिळून पॉलीग्राफ चाचणी झाली पाहिजे आणि या चाचणीचे थेट प्रक्षेपण व्हावे जेणेकरुन अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांचे सत्य देशासमोर येईल, असं या पत्रात म्हटले आहे.
"केरजीवालजी, मला आठवते की मी तुम्हाला घड्याळ भेट दिले होते. तुम्ही मला त्याचा पट्ट्याचा रंग बदलून निळ्या रंगात बदलायला सांगितले होते. सतेंद्र जैनजी, तुम्हाला आठवत असेल की मी दुबईच्या चार्टर्ड विमानातून कोणालातरी केजरीवाल यांच्या घड्याळाचा पट्टा बदलण्यासाठी पाठवले होते, असा दावा या पत्रात केला आहे.