केजरीवाल यांनी उभा केला नरेंद्र मोदी नावाचा राक्षस - अजय माकन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 09:05 AM2018-06-03T09:05:47+5:302018-06-03T09:05:47+5:30
एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे
नवी दिल्ली - एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे दिल्लीमध्ये काँग्रेस आम आदमी पक्षासोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करणार नसल्याचे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माकन यांनी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मोदी नावाचा राक्षस उभा करण्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा मोठा हात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजय माकन यांनी चार ते पाच वेळा मोदींचा उल्लेख राक्षस असा केला. ते म्हणाले, "अण्णांच्या आंदोलनामध्ये किरण बेदी, बाबा रामदेव, जनरल व्ही, के. सिंह यांच्यासोबत आरएसएस आणि भाजपाच्या पाठबळाच्या जोरावर मोदी नावाच्या राक्षसाला जर कुणी उभे केले असेल तर त्याचे नाव अरविंद केजरीवाल आहे."
आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करू शकतो. पण ज्यांनी मोदींसारखा राक्षस उभा केला, असे दिल्ली कार्यकर्त्यांचे मत आहे. अशा लोकांसोबत कशी काय आघाडी होऊ शकते. अण्णांच्या आंदोलनामधून केवळ आणि केवळ काँग्रेसची बदनामी करण्यात आली. या आंदोलनात बी. एस. येडीयुरप्पा, प्रेमकुमार धुमल, प्रकाशसिंह बादल यांच्यावर कोणतीही टीका करण्यात आली नाही. मात्र काँग्रेसवर सातत्याने टीका करून पक्षाला नुकसान पोहोचवले गेले. अशा परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते दिल्लीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपसोबत आघाडी करण्यास इच्छुक नाहीत.