Arvind Kejriwal Singapore visit: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या त्यांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे चर्चेत आले आहेत. केजरीवाल सातत्याने केंद्र सरकारवर त्यांच्या सिंगापूर दौऱ्यात अडथळा आणत असल्याचा आरोप करत आहेत. त्यांनी सोमवारी पुन्हा आरोपांचा पुनरुच्चार करत माझा सिंगापूर दौरा राजकीय कारणांमुळे थांबवला जात असल्याचे म्हटले. त्याचबरोबर मी गुन्हेगार नसून निवडून आलेला मुख्यमंत्री असल्याचेही ते म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना एका शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जायचे आहे, मात्र केंद्र सरकार त्यांना यासाठी परवानगी देत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. या मुद्द्यावरून 'आप'च्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शनेही केली.
याबाबत केजरीवाल म्हणाले की, त्यांना सिंगापूर येथे होणाऱ्या वर्ल्ड सिटीज समिटमध्ये सहभागी होण्यासाठी त्या देशाने आमंत्रित केले आहे. तिथे ते 'दिल्ली मॉडेल' जागतिक नेत्यांसमोर मांडणार आहेत. केंद्राने त्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्यास केलेल्या विलंबामुळे नाराज केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सांगितले की, ते गेल्या एक महिन्यापासून परवानगीची वाट पाहत आहेत. ते पुढे म्हणतात की, 'मी गुन्हेगार नाही, मी मुख्यमंत्री आणि देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. मला सिंगापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही, त्यामुळे त्यामागे काही राजकीय कारण असल्याचं दिसतंय.' सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वोंग यांनी जूनमध्येच केजरीवाल यांना शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं होतं. ही परिषद ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आले आहे.
आपचे संसद आवारात निदर्शनेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांनी केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याशी संबंधित फाइल मंजूर केलेली नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होताच 'आप'चे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनी संसदेच्या आवारात या मुद्द्यावर पोस्टर लावून निदर्शने केली. दिल्ली मॉडेलचे जागतिक स्तरावर होत असलेल्या कौतुकामुळे भाजप अस्वस्थ आहे आणि त्यामुळेच केंद्र सरकारने केजरीवाल यांना सिंगापूरला जाऊ दिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.